
रत्नागिरी, 23 मे (हिं.स.) । चिपळूण शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला तरुण कर्मचारी गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे (वय ३३) असे या युवकाचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत.
बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात चार पानी पत्र लिहून काही गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद पालांडे यांनी लिहिलेल्या पत्रात एचडीएफसी बँकेच्या चिपळूण शाखेतील चार जणांना आपल्या टोकाच्या निर्णयास जबाबदार धरले आहे. संबंधितांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा तसेच ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला मारहाण झाल्याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पालांडे गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून संपर्काबाहेर आहेत. त्यांच्या शोधासाठी कुटुंबीय आणि पोलिसांनी हालचाली सुरू केल्या असता कोळकेवाडी परिसरात त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली असून बोटीद्वारे परिसरात तपास केला जात आहे.
पालांडे बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी