नाशिक - आयएमएतर्फे तंबाखू विरोधीदिनानिमित्त विविध उपक्रम
मानसोपचार तज्ज्ञ संघटनेसह इतर विविध संघटनांचे पाठबळ नाशिक, 23 मे (हिं.स.)। - व्यसनाधीनतेचे विविध प्रकार असून, त्यापैकी तंबाखूचे सेवन हे विविध प्रकारे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग, श्वसनाचे विविध आजार, मानसिक आ
नाशिक - आयएमएतर्फे तंबाखू विरोधीदिनानिमित्त विविध उपक्रम


मानसोपचार तज्ज्ञ संघटनेसह इतर विविध संघटनांचे पाठबळ

नाशिक, 23 मे (हिं.स.)। - व्यसनाधीनतेचे विविध प्रकार असून, त्यापैकी तंबाखूचे सेवन हे विविध प्रकारे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग, श्वसनाचे विविध आजार, मानसिक आजार होतात. तसेच व्यक्तीच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर परिणाम होतो. म्हणूनच दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने समाजामध्ये तंबाखूच्या व्यसनाधीनतेबद्दल जनजागृती व्हावी आणि तरुण पिढीला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मदत व्हावी, हाच उद्देश आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेच्या नेतृत्वाखाली व मानसोपचारतज्ज्ञ संघटना नाशिक यांसह नाशिकमधील इतर संस्थांनी एकत्र येऊन तंबाखू विरोधी दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवार (२६मे) ते रविवार (३१ मे) या कालावधीत हे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

डॉ. प्रमोद महाजन यांच्या हॅपी ह्यूमन फाउंडेशनच्या सौजन्याने २९ ते ३१ मे व्यसनमुक्ती विषयावर जनजागृती प्रदर्शन असणार आहे. ३० मे रोजी सकाळी सायकल रॅली काढण्यात येणार असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

डॉक्टरांनीच लिहिलेले आणि डॉक्टरांकडूनच सादर होणारे पथनाट्य ३० मे रोजी सादर होणार आहे. रेडिओ विश्वास आणि रेडिओ नमकीन या दोन्हीही रेडिओ चॅनलवर तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रम सादर होणार आहे.

मानसोपचार तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ विलास चकोर, सचिव डॉ मानस सुळे यांच्या नेतृत्वात नाशिक मानसोपचार तज्ञ संघटनेमार्फत विविध ठिकाणी व्यसनमुक्ती आणि आरोग्य विषयक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण शहरात विविध संस्थांच्या सहकार्याने पोस्टर्स, बॅनर्स यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.

या संपूर्ण उपक्रमासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉ विशाल पवार, सचिव डॉ पंकज भट, खजिनदार डॉ सागर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक म्हणून डॉ अनुप भारती, डॉ सुमित शिंपी, डॉ शिल्पा दयानंद, डॉ प्रणित मानकरे, डॉ निशा जाधव हे सर्व सूक्ष्म नियोजन करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande