कर्नाटकातील कलबुर्गी येथे भीषण रस्ता अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
बंगळूर, 23 मे (हिं.स.)। कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर गावाजवळ शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. क्रूझर वाहन आणि भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा
Karnatak horrific road accident five die


बंगळूर, 23 मे (हिं.स.)। कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर तालुक्यातील लाडलापूर गावाजवळ शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. क्रूझर वाहन आणि भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

मृत सर्वजण चित्तापूर तालुक्यातील इंगळगी गावचे रहिवासी असून ते एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतांची ओळख टोलू पाशा (२७), महिबूब (४५), हुसेनी बुड़ान शाहा (४८), रसूल बी (४२) आणि फातिमा (३८) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंगळगी गावातील एका आजारी व्यक्तीला उपचारासाठी यादगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबीय क्रूझर वाहनातून आपल्या गावाकडे परतत होते. त्याचवेळी उशिरा रात्री लाडलापूर गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने क्रूझर वाहनाला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की क्रूझर वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला आणि त्यामधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande