
पुणे, 23 मे (हिं.स.)।
पुणेकरांची जीवनवाहिनी ठरू पाहणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो)च्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मॉन्सूनपूर्व झालेल्या जोरदार पावसानंतर मेट्रोच्या भूमिगत स्थानकांमध्ये पाणी गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रवाशांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग तीन ते चार तास झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. याच दरम्यान पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते वनाज मार्गावरील एका भूमिगत स्टेशनमध्ये छत आणि भिंतींमधून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे समोर आले. काही ठिकाणी तर पाण्याचे लोट वाहताना दिसत होते. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
पुणे मेट्रो प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोच्या संयुक्त माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात अशा प्रकारे पाणी गळती होणे हे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण करणारे असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.
“कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मेट्रोची ही अवस्था असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचं काय?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु