
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खासदार धनंजय महाडिक यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कमेंटस्, टीका-टिप्पणी तसेच भीमा साखर कारखान्यावरील आरोप-प्रत्यारोप यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद वाढत गेला. त्यातूनच हा संघर्ष उफाळल्याचे बोलले जात आहे.या हाणामारीदरम्यान डोळ्यात मारण्याचा स्प्रे, फायटर आणि इतर घातक हत्यारांचा वापर झाल्याची चर्चा असून घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंढरपूर किंवा मोहोळ पोलिस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र, दोन्ही बाजूंकडून तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड