
बीड, 23 मे (हिं.स.) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत परळी येथील ऐतिहासिक श्रीक्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. हा आराखडा मंजूर झाला तेव्हा पंकजा मुंडे या चार धाम यात्रेदरम्यान केदारनाथच्या दर्शनासाठी गेल्या होत्या, त्यामुळे त्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. या निधीतून परळी मंदिर परिसर आणि शहराचा चेहरामोहरा बदलणार असून भाविकांना मोठ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मागील सरकारमध्ये मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील इतर प्रमुख देवस्थानांसोबतच परळीच्या ३०१ कोटींच्या आराखड्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे पंकजा मुंडे केदारनाथाच्या दर्शनाला गेल्या असतानाच त्याच दिवशी मुंबईत हा निर्णय झाला, ज्यामुळे हा एक सुवर्णयोग मानला जात आहे. या आराखड्यांतर्गत परळी शहरात आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत आणि सौंदर्यीकरणाची विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.
केदारनाथहून परतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केदारनाथाचा पवित्र प्रसाद आणि पुष्पगुच्छ देऊन या भरीव निधीच्या मंजुरीबद्दल संपूर्ण परळीकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. या विकासकामामांमुळे परळीच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis