पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; 10 दिवसांत तब्बल 5 रुपयांची वाढ
नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.) : देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील इंधन विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीसह देशभरात पेट्रोलच्या किंमतीत प्रति लि
पेट्रोल पंप लोगो


नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.) : देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील इंधन विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीसह देशभरात पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 87 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

या महिन्यात इंधन दरवाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी 16 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट 3 रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर 19 मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा 90 पैशांची दरवाढ झाली होती.शनिवारी झालेल्या ताज्या वाढीनंतर गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर तब्बल 5 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या दरातही प्रति किलो 1 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांतील ही सीएनजी दरवाढीची तिसरी वेळ आहे. नवीन दरानुसार दिल्लीत सीएनजीचा दर 81.09 रुपये प्रति किलो झाला असून नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर 89.70 रुपये प्रति किलो इतका असेल.

यापूर्वी 15 मे रोजी सीएनजीच्या दरात 2 रुपयांची आणि 18 मे रोजी पुन्हा 1 रुपयाची वाढ करण्यात आली होती. सतत होत असलेल्या या इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इंधन विक्रेत्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि तेल कंपन्यांच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन इंधन दर शनिवारी सकाळी 6 वाजेपासून लागू करण्यात आले असून स्थानिक व्हॅट आणि वाहतूक शुल्कामुळे विविध राज्यांमध्ये किंमतींमध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande