
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागांत इंधनटंचाईच्या अफवा पसरत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठवणूक करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यास दररोज सुमारे ६२४ केएल पेट्रोल आणि १,२४० केएल डिझेलची आवश्यकता असते. सध्या तेल कंपन्यांकडे २६ हजार १८१ केएल पेट्रोल आणि ४५ हजार ७७० केएल डिझेलचा साठा उपलब्ध असून हा साठा पुढील सात ते आठ दिवस पुरेल इतका असल्याचे सांगण्यात आले आहे.सोलापुरातील पाकणी येथे तेल साठवणूक डेपो असून मुंबईतील रिफायनरीमधून पाईपलाईनद्वारे नियमित इंधनपुरवठा सुरू असल्यामुळे जिल्ह्यात इंधनटंचाईची कोणतीही परिस्थिती नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना विशेष सूचना दिल्या आहेत. वाहनाशिवाय ड्रम, बाटली किंवा इतर भांड्यात इंधन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, ओळखपत्राची माहिती, इंधनाचा वापर कशासाठी होणार आहे, इंधन कोठे नेण्यात येणार आहे याची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा मोबाईलमधील फोटो घेऊन नोंद वही जतन करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड