
इगतपुरी, 23 मे (हिं.स.)। शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व दंगा नियंत्रण पोलीस दल यांच्यासह पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी शहरातून पोलीस ताफा, होमगार्ड, दंगा नियंत्रण राखीव पोलीस पथक यांच्या ताफ्यासह शहरातील पोलीस ठाणे ते जुना मुंबई महामार्गादरम्यान रूट मार्च काढण्यात आला.
सदरचा रूट मार्च इगतपुरी पोलीस ठाण्यातून सुरू होऊन जुना मुंबई आग्रारोडमार्गे बसस्थानक, रेल्वेस्थानक, सेंटर पॉइंट, शिवाजी चौक, राम मंदिर, तीन लकडी पूल, नेहरू चौक, सेंटर पॉइंट चौक, भाजी मार्केट, पटेल चौक, रमाबाई आंबेडकरनगर, बजरंगवाडा, आंबेडकर चौक पुतळा, नगरपालिका रोड, शिवाजी
महाराज पुतळा, नगरपालिका, बसस्थानकापासून पोलीस ठाण्यात सांगता झाली. या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गायधनी, पोलीस उपनिरीक्षक कांजन भोजने, गणेश परदेशी यांच्यासह गोपनीय पोलीस नीलेश देवराज यांच्यासह २५ जवान, १५ हवालदार, सीमा रक्षक दल आदी सहभागी झाले होते.
बकरी ईद तसेच इतर उत्सवात नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट सोशल मीडियावर पसरवू अथवा ठेवू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे निदर्शनात आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षक अहिरराव यांनी सांगितले. याप्रसंगी शहरातून काढलेल्या पोलीस ताफ्यातील रूट मार्चदरम्यान नागरिकांना कायदा सुव्यवस्थेबाबत प्रबोधन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV