
परभणी, 23 मे (हिं.स.)।
गेल्या महिनाभरापासून परभणी महानगरासह संपूर्ण जिल्हा रखरखत्या उन्हाने, उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून निघाला असतांना सुध्दा वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी दिलासा देणे तर दूरच दिवसभरात आठ-दहा वेळा वीज गुल तर काही भागात तासनतास वीज पुरवठा खंडीत करीत संपूर्ण शहरास वेठीस धरले आहे.
यावर्षीचा उन्हाळा नेहमीप्रमाणे सर्वसामान्य नागरीकांच्या दृष्टीने अक्षरशः हवालदिल करणारा ठरला आहे. त्याचे कारण, फेबु्रवारी अखेरपासूनच हवेतील उष्णतेने मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला. मार्च महिन्यात तर मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढल्याने संपूर्ण वातावरण अक्षरशः गरमा गरम झाले. गेल्या चार-सहा दिवसांपासून तर उष्णतेने कहरच केला आहे. तापमान सर्वसाधारणपणे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्य नागरीक अक्षरशः होरपळून निघाले आहेत. या स्थितीत नागरीकांना वीज वितरण कंपनीद्वारे दिलासा मिळेल, विशेषतः सुरळीतपणे वीज पुरवठा कायम राहील, असे अपेक्षित होते. दुर्देव असे, दिलासा देण्याऐवजी वीज वितरण कंपनीने तासनतास अघोषित अशी लोडशेडींग सुरु केली आहे. त्यामुळे सामान्य नागरीक कमालीचे संतापले आहेत. शहरी भागात मध्यवस्तीसह चोहोबाजूंनी सातत्याने वीज पुरवठा खंडीत करण्याचे, तासनतास वीज गायब करण्याचे व अघोषित अशी लोडशेडींग करण्याचे हे प्रकार नागरीकांना अक्षरशः अंगवळणी पडले आहेत.
शुक्रवार 22 मे रोजी रात्री श्री क्षेत्र दत्तधाम पासून ते नवामोंढा पोलिस ठाण्यापर्यंतच्या वसाहतींमध्ये वीज गुल झाली. वीज पुरवठा तात्काळ सुरु केला जाईल, असे अपेक्षित होते. परंतु, रात्री साडेअकरा वाजेपर्यंत या भागाचा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. आज शनिवार 23 मे रोजीही सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरासह स्टेशन रस्त्यावरील बहुतांशी भागात किमान सहा वेळा वीज पुरवठा खंडीत झाला. दुपारी सव्वा चार वाजता वीज गायब झाली. ती सव्वा पाचपर्यंत आलीच नाही.
असेच चित्र सर्वदूर आहे. राज्याच्या उर्जा राज्य मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत रहावा या दृष्टीने सक्त सूचना दिल्या आहेत. परंतु, ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे अभियंत्यांनी उर्जा राज्य मंत्र्यांचे म्हणणे एका कानाने एकले आणि दुसर्या कानाने सोडून दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis