
पुणे, 23 मे (हिं.स.)।
पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवणारी सेवा सुरू झाली आहे‘उबर’ने आपल्या अॅपवर पुणे मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’च्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे.या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना आता थेट ‘उबर’ अॅपमधून मेट्रो प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. तसेच क्यूआर-आधारित मेट्रो तिकीट खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तिकीट काउंटरवरील रांगा किंवा वेगळे अॅप वापरण्याची गरज उरणार नाही.दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईनंतर पुणे हे ‘उबर’ची मेट्रो तिकीट सेवा सुरू झालेले देशातील पाचवे शहर ठरले आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि स्मार्ट प्रवास पर्यायांची मागणी लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, मर्यादित कालावधीसाठी ‘उबर’ अॅपवरून मेट्रो तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. मात्र ही सवलत कमाल १० रुपयांपर्यंत मर्यादित असेल. ‘उबर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोस्रोशाही यांनी भारत दौऱ्यात सांगितले की, देशभरात उबर अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींपेक्षा अधिक मेट्रो प्रवास बुक करण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि डिजिटल सेवांप्रती नागरिकांचा वाढता कल दिसून येत आहे.पुण्यातील प्रवाशांना आता यूपीआयद्वारे थेट मेट्रो तिकीट बुक करता येणार असून पुढील प्रवासासाठी ‘उबर ऑटो’, ‘बाईक’ आणि ‘गो’ यांसारख्या सेवांचाही सहज वापर करता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु