रुग्णांची लूट सहन केली जाणार नाही; डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा थेट इशारा
बीड, 23 मे (हिं.स.)। गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांची कोणत्याही रुग्णालयाकडून होणारी आर्थिक लूट अथवा अनुचित प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा आयुष्मान भारत मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिला आहे. बीड
रुग्णांची लूट सहन केली जाणार नाही; डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा थेट इशारा


बीड, 23 मे (हिं.स.)।

गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांची कोणत्याही रुग्णालयाकडून होणारी आर्थिक लूट अथवा अनुचित प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा आयुष्मान भारत मिशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि सन्मानकारक आरोग्य सुविधा मिळवून देणे हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मिशनचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला आमदार सुरेश धस, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम, तहसीलदार वैशाली पाटील, नगराध्यक्ष झिया बेग, दत्ताभाऊ काकडे, डॉ. गायकवाड, जिल्हा समन्वयक डॉ. शिवशंकर गलांडे, डॉ. वसीम शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश तांदळे, गटविकास अधिकारी बागलावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे आणि उद्धव सानप आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शेटे यांनी प्रशासकीय यंत्रणेला योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिक समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले.

डॉ. शेटे पुढे म्हणाले की, आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी लाखो रुपयांच्या मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी रुग्णांना योग्य माहिती न मिळणे किंवा हॉस्पिटल्सकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा प्रकारांना शासकीय पातळीवर अजिबात थारा दिला जाणार नाही आणि दोषी आढळणाऱ्या संबंधित रुग्णालयांवर तात्काळ व कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने आणि योग्य पद्धतीने उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे.

याप्रसंगी बोलताना आमदार सुरेश धस यांनी डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. डॉ. शेटे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होत आहे, असे धस यांनी नमूद केले. शासनाच्या या कल्याणकारी योजनांपासून एकही पात्र, गरीब आणि वंचित घटक वंचित राहणार नाही, असा विश्वासही आमदार धस यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande