
सोलापूर, 23 मे (हिं.स.)।
डिझेलच्या वाढत्या दरांचा परिणाम आता विद्यार्थ्यांच्या वाहतूक खर्चावर दिसू लागला असून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील खासगी शाळांनी स्कूल बस भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.सध्या सोलापूर ग्रामीण भागात डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.०९ रुपये तर शहरात ९५.४२ रुपये इतका आहे. मागील काही दिवसांत डिझेल दरात सुमारे चार रुपयांची वाढ झाली असून मागणीच्या तुलनेत पुरवठाही अपुरा असल्याचे चित्र आहे.
आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर अनेक खासगी शाळांनी पालकांना स्कूल बस भाडेवाढीबाबत संदेश पाठविले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याचे शाळांकडून सांगण्यात आले आहे. काही शाळांनी “शाळा व्यवस्थापन समिती सदैव तुमच्यासोबत आहे,” असा उल्लेख करत पालकांना अगाऊ सूचना दिल्या आहेत.दुसरीकडे, खासगी स्कूल बस संघटनेनेही प्रति किलोमीटर १०० रुपये भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बसचालकांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे १३ ते १५ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक परवानाधारक स्कूल बसद्वारे केली जाते. याशिवाय खासगी वाहने आणि ऑटोरिक्षांमधूनही हजारो विद्यार्थी प्रवास करतात. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण १,२६७ स्कूल बसची नोंद सोलापूर आणि अकलूज आरटीओ कार्यालयात आहे.दरम्यान, १५ जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने यंदा पालकांना स्कूल बस भाड्यासाठी वार्षिक १८ हजार ते २५ हजार रुपये मोजावे लागणार असून हे शुल्क गतवर्षीच्या तुलनेत दीड ते तीन हजार रुपयांनी अधिक असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड