
रत्नागिरी, 23 मे (हिं.स.) । अनिरुद्धाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीने वनसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या वनदुर्गा योजनेअंतर्गत यंदाच्या सीडबॉल सेवा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. एक सीडबॉल एक नवीन झाड या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात राबविण्यात येणार असून अधिकाधिक सेवेकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विविध वृक्षांच्या बिया संकलित करून त्यापासून सीडबॉल तयार करण्यात येणार आहेत.
या अभियानाअंतर्गत ३१ मेपर्यंत बिया संकलन कराव्यात. त्यानंतर १ ते १५ जून या कालावधीत सीडबॉल तयार करावेत. सीडबॉलचा आकार साधारण लिंबाएवढाच असावा. अतिशय मोठ्या आकाराचे सीडबॉल तयार करू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे. आंब्याच्या बाठांचे सीडबॉल तयार करू नयेत. कारण बाठा थेट मातीत लावता येतात. लाल, काळी माती, शेणखत यांचा वापर करून हे सीडबॉल तयार करावेत. एका सीडबॉलमध्ये एक बी घालावे. तयार झालेले सीडबॉल घरात व्यवस्थित सुकवून साठवावेत. प्रत्येकी २० सीडबॉल्स एका प्लास्टिक पिशवीत भरून ठेवावेत. खोका असल्यास सुरक्षित राहतील, असे ठेवावेत.
पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि भविष्यातील हरित समतोल राखण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या सेवाकार्यात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासंदर्भात अनिरुद्धाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. पौरससिंह जोशी यांनी सांगितले की, “एक सीडबॉल म्हणजे भविष्यातील एका नव्या वृक्षाची सुरुवात आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाचे योगदान असणे ही काळाची गरज आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी