धुळे येथे ५६ लाख ४४ हजारांची अवैध दारू जप्त
धुळे , 23 मे (हिं.स.)शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५६ लाख ४४ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चार ज
धुळे येथे ५६ लाख ४४ हजारांची अवैध दारू जप्त


धुळे , 23 मे (हिं.स.)शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५६ लाख ४४ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील तोरणमाळ रोडने एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावरील राणीपूर दशामाता मंदिराजवळ सापळा रचला. रात्री ८:२० वाजेच्या सुमारास म्हसावदकडून तोरणमाळकडे जाणारी पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी येताना दिसली. पोलिसांचे पथक पाहून चालकाने आणि क्लीनरने वाहन रस्त्यावरच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलिसांनी वाहनाची (क्र. एम एच १५ एच एच ८२७६) तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह २६,८०,००० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. तपास दरम्यान पोलिसांना गोपनिय माहिती मिळाली की, हा दारू साठा म्हसावद येथील सत्तार ठाकरे याचा असून, त्याने त्याच्या घराजवळील खोलीत आणखी दारू लपवून ठेवली आहे. पथकाने तात्काळ पंचांसह सत्तार ठाकरे याच्या म्हसावद (अनकवाडे, ता. शहादा) येथील घरावर छापा टाकला. त्याचे घर बंद होते, मात्र घराची झडती घेतली असता तेथे २९,६४,४८० रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा सापडला. या ठिकाणी पोलिसांना एका व्यक्तीचे आधारकार्ड देखील मिळून आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात चार आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), १०८, ८१ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १९३/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर धडक कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, तसेच पोलीस कर्मचारी जितेंद्र पाडवी, दादाभाऊ वाघ, सजन वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, सुनील येलवे, सचिन वसावे, पुरुषोत्तम सोनार, यशोदीप ओगले आणि राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande