
नाशिक, 23 मे (हिं.स.)नाशिक विधानपरिषदेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला दावा ठोकल्याने महायुतीत अंतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, शिवसेनेने माघार घेण्यास नकार दिल्यास भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
२०१८ च्या विधानपरिषद निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले होते. त्यामुळे परंपरेनुसार ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही “ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्याच पक्षाने लढवावी” असे स्पष्ट मत व्यक्त करत शिवसेनेचा दावा मजबूत केला आहे.दुसरीकडे, भाजपनेही या जागेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून नाशिकमध्ये भाजपची मजबूत संघटनात्मक ताकद आणि सर्वाधिक मतदारसंख्या लक्षात घेता ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन हे देखील ही जागा भाजपकडेच राहावी, या मताचे असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषद निवडणुकीत ६१९ सदस्य मतदान करणार असून त्यापैकी महायुतीकडे तब्बल ४६६ मतांचे बळ आहे. यात भाजपकडे १८८, शिवसेनेकडे १७१ तर राष्ट्रवादीकडे १०७ सदस्य आहेत. त्यामुळे सर्वाधिक मतदारसंख्या भाजपकडे असल्याने पक्षाने या जागेवर दावा अधिक आक्रमकपणे मांडला आहे.दरम्यान, शिवसेनेकडून माजी आमदार नरेंद्र दराडे किंवा आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. हे दोघेही मंत्री छगन भुजबळ यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे शिवसेनेने यापैकी कोणालाही उमेदवारी दिल्यास भुजबळ भाजपच्या बाजूने सक्रिय भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
चौकट राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार याच पार्श्वभूमीवर, भाजप-शिवसेना संघर्ष वाढल्यास राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला राजकीय धक्का देण्यासाठी भाजप राष्ट्रवादीसोबत रणनीती आखू शकते. इतकेच नव्हे तर भाजपकडून छगन भुजबळ यांच्या पसंतीच्या उमेदवारालाही संधी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या लढतीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहीले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV