
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आमदारपदासाठी भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे. अशातच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शुक्रवारी मुंबई ते सोलापूर असा एकत्रित विमानप्रवास केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. पक्षातून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, राजन पाटील, माढ्याचे रणजितसिंह शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.दरम्यान, पालकमंत्री गोरे आणि राजेंद्र राऊत यांच्या एकत्रित विमानप्रवासामुळे राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री बार्शीमध्ये राऊत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केल्याचीही चर्चा रंगली असून राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.मात्र दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित लक्षात घेता भाजपकडून प्रशांत परिचारक यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेंद्र राऊत यांच्यासाठी बार्शी विधानसभा मतदारसंघ उपलब्ध असताना, परिचारक यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने पक्ष त्यांचा विचार करू शकतो, अशी चर्चा आहे.याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्याl पार्श्वभूमीवर भाजप माढा लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यावर भर देत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः माढा आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यावर भाजप लक्ष केंद्रित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड