सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ४.९९ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ साठी कृषी विभागाने तब्बल ४ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे
Pik Veema


सोलापूर, 23 मे (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ साठी कृषी विभागाने तब्बल ४ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात तसेच वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यात ४ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. यंदाच्या हंगामासाठी आवश्यक खते आणि बियाण्यांचे नियोजन प्रशासनाने आधीच केले असून बफर स्टॉकही उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सध्या जिल्ह्यात २ लाख ५१ हजार ९०० मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असून आणखी काही साठा लवकरच उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना कोणतेही ‘लिंकिंग’ न करता थेट खते उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश प्रशासनाने विक्रेत्यांना दिले आहेत.दरम्यान, बोगस खते आणि बियाण्यांची विक्री करणाऱ्या तसेच लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होताच तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दुष्काळ आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून कृषी विभागाकडून ‘एल निनो सुरक्षा कवच पंचसूत्री’ राबविण्यात येणार आहे. यामध्ये पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, पावसातील खंड व्यवस्थापन आणि जोखीम व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande