पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांची कठोर कारवाई; सराईत गुन्हेगार थेट येरवडा जेलमध्ये
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। सोलापूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या सव्वादोन वर्षांत तब्बल ५६ सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संबंधित गु
CP rajkumar


सोलापूर, 23 मे (हिं.स.)।

सोलापूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असून गेल्या सव्वादोन वर्षांत तब्बल ५६ सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संबंधित गुन्हेगारांना थेट पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.२० फेब्रुवारी २०२४ ते २० मे २०२६ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली असून १९९२ मध्ये सोलापूर पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘एमपीडीए’ कायद्याचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी रात्री उशिराही एका सराईत गुन्हेगारावर ही कारवाई करण्यात आली.पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या या कामगिरीची दखल घेत अपर पोलिस महासंचालकांनीही त्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र पोलिस कायद्याअंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांना किंवा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना सहा महिने ते दोन वर्षांसाठी तडीपार केले जाते. आदेशाचे उल्लंघन करून संबंधित आरोपी पुन्हा त्या हद्दीत आढळल्यास त्यांना विनावॉरंट अटक करून तुरुंगात पाठविले जाते.गेल्या सव्वादोन वर्षांत सोलापूर शहरातील १७० जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून सरासरी पाच दिवसांत एका गुन्हेगारावर अशी कारवाई होत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, वाळू तस्करी, अवैध दारू व्यवसाय, ड्रग्ज विक्री-वाहतूक, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक ठिकाणी मारामाऱ्या, चोरी, घरफोडी आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande