
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। सोलापूर शहरातील एका टेक्स्टाईल एजंटला ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी तब्बल ६८ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी किरण नागनाथ कोटा (वय ४९, रा. रंगराज नगर, मार्केट यार्डामागे, सोलापूर) यांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी किरण कोटा हे घरी असताना फेसबुक पाहत होते. त्यावेळी त्यांना आयआयएफएल कॅपिटल लिमिटेडच्या नावाची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवर क्लिक करताच त्यांचा समावेश एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये करण्यात आला. त्या ग्रुपमध्ये आर. व्यंकटरमन, टीना मल्होत्रा आणि टीना या नावांचे सदस्य ॲडमिन म्हणून सक्रिय होते.यानंतर संबंधितांकडून कोटा यांच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्यात आला. ‘डीएमए’ अर्थात डायरेक्ट मार्केट ॲक्सेस खात्याच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेडिंग करून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. ट्रेडिंगची प्रक्रिया आणि नफ्याचे गणित विश्वासार्ह पद्धतीने समजावून सांगितल्याने कोटा यांनी त्यावर विश्वास ठेवला.फिर्यादीला शेअर मार्केटची प्राथमिक माहिती असल्याने त्यांनी विविध व्यवहारांद्वारे मोठी रक्कम गुंतवली. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणाचा तपास शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे सोपविण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील गुंतवणूक जाहिरातींवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड