
ठाणे, 23 मे (हिं.स.)। केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयांतर्गत पेयजल व स्वच्छता विभागामार्फत ग्रामीण भागासाठी “घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६” लागू करण्यात आले असून हे नियम दि. १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण देशात अंमलात आले आहेत. या नियमांचे प्रभावीपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ऑनलाइन बैठकीत नमूद केले आहे.
यावेळी घनकचर्याचे वर्गीकरण, जागेची तपासणी तसेच नोंदणी करणे आवश्यक असल्याबाबत ग्रामीण भागात कार्यरत अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चे नियोजन करण्याचे आवाहन केले.
या ऑनलाईन बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनाबाबत विविध जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात स्वच्छता, कचरा वर्गीकरण, कचरा संकलन आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना फॉर्म-४ वितरित करून आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पर्यटनस्थळे, धार्मिक व यात्रास्थळे येथे विशेष स्वच्छता यंत्रणा उभारण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.
घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था, व्यावसायिक आस्थापना अथवा संबंधित घटकांवर आवश्यक ती दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यासोबतच दर पंधरवड्याला अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात घराघरांतून कचरा संकलन व्यवस्था प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींनी ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्याची व्यवस्था उभारणे, बल्क वेस्ट जनरेटर्सची नोंदणी करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट उभारणे तसेच जुन्या कचरा डेपोचे निर्मूलन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामविकास आराखड्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गावपातळीवर कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे, स्वच्छता मोहिमा राबविणे तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे यावरही भर देण्यात येत आहे.
“स्वच्छ व निरोगी ग्रामीण परिसर निर्माण करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. ग्रामपंचायती, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी सामूहिक सहभागातून स्वच्छता अभियान यशस्वी करावे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन केल्यास पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होईल.” - मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव
जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती मोहीम, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर