
ठाणे, 23 मे (हिं.स.) :- राज्यात उन्हाचा पारा चढत असतानाच ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अत्यंत प्रभावी आणि गतिमान नियोजन करून जिल्ह्यातील दुर्गम टंचाईग्रस्त भागाला मोठा दिलासा दिला आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या तत्पर उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील दुर्गम गावे आणि पाड्यांमधील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या दि. २२ मे २०२६ अखेरपर्यंतच्या ताज्या साप्ताहिक अहवालानुसार, जिल्ह्यातील पाणीटंचाईची दाहकता कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत असून, 38 गावे आणि 134 टँकरग्रस्त वाडयांतील नागरिकांना वेळेत, शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
भौगोलिक रचनेमुळे दरवर्षी तीव्र पाणीटंचाई कालावधीत सर्वाधिक बाधित होणाऱ्या शहापूर तालुक्यात जिल्हा प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेत सूक्ष्म नियोजन केले आहे. शहापूरमधील टंचाईग्रस्त गावे आणि पाड्यांमधील लोकसंख्येला पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्हा परिषदेने खाजगी टँकर्सची तैनात केले आहेत. येथील तब्बल 33 गावे आणि 124 वाड्या पाणीटंचाईने बाधित असून, तिथल्या ५२ हजार ९२ नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्हा परिषदेने 37 खाजगी टँकर्स तैनात केले आहेत. या टँकर्सच्या नियमित फेऱ्यांचे चोख नियंत्रण ठेवल्यामुळे दुर्गम भागातील वाड्या-पाड्यांवर राहणाऱ्या हजारो नागरिकांची पाण्याची गरज यशस्वीपणे पूर्ण होत आहे.
मुरबाड तालुक्यातही प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून, तेथील 05 बाधित गावे आणि 10 वाड्यांमधील 4 हजार 916 नागरिकांच्या लोकसंख्येसाठी 3 खाजगी टँकर्सद्वारे नियमित व अविरत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केलेल्या पूर्वतयारी आणि योग्य व्यवस्थापनामुळे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, तिथे टंचाईची कोणतीही गंभीर झळ पोहोचलेली नाही. या तिन्ही तालुक्यांत सध्या एकही गाव किंवा वाडी टंचाईबाधित नसल्याने टँकरची आवश्यकता भासलेली नाही.
एकंदरीत परिस्थिती पाहता, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीला एकूण 38 गावे आणि 134 वाड्या पाणीटंचाईने प्रभावित असून, या सर्व भागातील 57 हजार ८ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने एकूण 40 खाजगी टँकर्स कार्यान्वित केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात आवश्यकतेनुसार खाजगी टँकर्स अधिग्रहित करून प्रत्येक टंचाईग्रस्त घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची चोख व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर