
परभणी, 23 मे (हिं.स.)।
शहरातील ‘अभिव्यक्ती कट्टा’ या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत ‘गुरुदत्त - वेदनेचा सफरनामा’ हा विशेष दृकश्राव्य रसास्वादात्मक कार्यक्रम रविवार 24 मे रोजी सायंकाळी 7 वाजता रसिकराज वसंत पाटील खुला मंच श्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील संवेदनशील आणि प्रतिभावान दिग्दर्शक-अभिनेता गुरुदत्त यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा कार्यक्रम प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी (नाट्यकलाकार, रंगकर्मी व अभिवाचक) सादर करणार आहेत.
परभणी शहराच्या सांगीतिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ कलारसिक तथा संस्कृतीप्रेमी वसंत पाटील यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘अभिव्यक्ती कट्टा, परभणी’च्या वतीने ‘रसिकराज वसंत पाटील खुला मंच’ या नव्या सांस्कृतिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या मंचाच्या माध्यमातून वर्षभरात चार ते पाच दर्जेदार आणि अभिजात कलांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य अशा विविध कलाक्षेत्रांतील उत्कृष्ट सादरीकरणांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी नि:शुल्क असणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रविवारी आयोजित केलेल्या या अभिनव सांस्कृतिक कार्यक्रमास परभणीतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis