
पुणे, 23 मे (हिं.स.)।
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत निवडणुकीचा आढावा घेत संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी केली.राज्य निवडणूक आयोगाने नुकताच विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यसंख्या भाजपपेक्षा अधिक असल्याने या जागेवर पक्षाने दावा करावा, अशी भूमिका पक्षातील नेत्यांकडून मांडली जात आहे.या पार्श्वभूमीवर बारामती होस्टेल येथे पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार चेतन तुपे, शंकर मांडेकर, सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, राजेंद्र कोरेकर, माजी आमदार विलास लांडे, दिलीप मोहिते, सुरेश घुले, योगेश बहल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच उमेदवार देण्याची जोरदार मागणी केली. तसेच उमेदवार निवडीचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, सुनेत्रा पवार यांनीही उपस्थित नेत्यांशी सविस्तर चर्चा करून संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली. याशिवाय पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणूक रणनीतीवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु