
परभणी, 23 मे (हिं.स.)।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट दिल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसतर्फे आज शनिवार 23 मे रोजी शहरातील आर.आर. पेट्रोल पंप परिसरात नागरिकांना चॉकलेट वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवरून युवक काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
केंद्र सरकारकडून जनतेला केवळ आश्वासनांचे लॉलीपॉप दिले जात असून प्रत्यक्षात सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. जनतेला केवळ आश्वासने दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. पेट्रोल-डिझेलचा वाढता काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
हे आंदोलन सचिन जवंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी अमोल जाधव, वैजनाथ देवकत्ते, तानाजी धरणे, वसंत आहेर, डिगांबर खरवडे, मारोतराव चव्हाण, कृष्णा गिरे, काशीनाथ हलकुडे, राजेश रेंगे, अंगद लव्हाळे, सोमनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis