
सोलापूर, 23 मे (हिं.स.)। करमाळा शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर असून नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्याने पाणीपुरवठ्याशी संबंधित दोन महत्त्वाच्या कामांना तब्बल ६६.५३ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे करमाळा शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत होता. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला.सध्या दहीगाव येथील पंपहाऊसला जेऊर सबस्टेशनवरून वीजपुरवठा केला जातो. मात्र, जेऊर ते दहीगाव अंतर जास्त असल्याने तांत्रिक बिघाड आणि नैसर्गिक कारणांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत होता.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता दहीगाव येथील पंपहाऊसला थेट दहीगाव सबस्टेशनवरून वीजपुरवठा केला जाणार आहे. या बदलासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्राथमिक परवानग्या नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी जेऊर, बार्शी आणि सोलापूर स्तरावरून मिळविल्या.या कामासाठी २९ लाख ९४ हजार ४८० रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे करमाळा शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि स्थिर होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड