
विधान परिषद निवडणुकीत 'पसंतीक्रम' पद्धतीची नव्या मतदारांमध्ये उत्सुकता
अमरावती, 24 मे (हिं.स.)
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-२०२६ अंतर्गत होणाऱ्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीकडे यंदा राजकीय वर्तुळासह नव्या मतदारांचे विशेष लक्ष लागले आहे. या निवडणुकीत वापरली जाणारी 'पसंती क्रमांक' मतदान पद्धती आणि विजयासाठी आवश्यक असलेला वैध मतांच्या '५० टक्के प्लस एक' मतांचा कोटा यामुळे नवीन मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माणझाली आहे.
या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांचे पसंतीक्रम देण्याची सुविधा असते. मतदार आपल्या मतपत्रिकेवर पहिली, दुसरी, तिसरी अशा क्रमाने उमेदवारांची पसंती नोंदवू शकतात. त्यामुळे ही निवडणूक सर्वसाधारण मतदानापेक्षा वेगळी आणि अधिक रंजक मानली जाते. विजयासाठी उमेदवाराला वैध मतांच्या ५० टक्के अधिक एक मतांचा कोटा पूर्ण करावा लागतो. पहिल्या फेरीतील मतमोजणीत एखाद्या उमेदवाराला आवश्यक कोटा प्राप्त झाला तर त्याचा विजय निश्चित मात्र, कोणालाही आवश्यक मतांचा टप्पा गाठता आला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यामुळे प्रत्येक पसंतीक्रमाला या निवडणुकीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय जाणकारांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरतात. त्यामुळे उमेदवारांकडून केवळ पहिल्या पसंतीपुरतेच नव्हे तर इतर उमेदवारांच्या समर्थकांशीहीसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. यंदा प्रथमच मतदान करणारे महापालिकेचे अनेक नगरसेवक, नगरपंचायत व नगरपरिषदेच सदस्य याप्रक्रियेबाबत माहिती घेत असल्याचे चित्र आहे. विशेषतः 'एकच मत, पण अनेक पसंती' या पद्धतीमुळे मतमोजणीची उत्सुकता अधिक वाढली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक केवळ राजकीय प्रतिष्ठेची नसून पसंतीक्रमाच्या गणितामुळे शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी