
बीड, 24 मे (हिं.स.)।बीड शहरातील एका शाही विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजी दरम्यान दारूगोळ्याचा गोळा थेट मंचासमोरील फोटोग्राफर्सच्या जवळ येऊन फुटल्याने ५ फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेत फोटोग्राफरचा चेहरा, डोळा आणि शरीर मोठ्या प्रमाणावर भाजले असून त्यांच्या महागड्या कॅमेऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जखमी यांचे स्वतःचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या लग्न आयोजक, इव्हेंट कंत्राटदार आणि फायर वर्क चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.
या घटनेचे ड्रोन फुटेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. विवाह सोहळ्यात केवळ बडेजाव दाखवण्यासाठी साध्या सुरक्षेच्या नियमांचीही कशी पायमल्ली केली जाते, हे या घटनेतून समोर आले आहे. जखमींच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन निवेदन दिले असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटनांमुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रशासनाने इव्हेंट मॅनेजर्सवर कडक नियमावली लागू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis