
पुणे, 24 मे (हिं.स.)।
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जवळ येत असताना, पुण्याच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि काँग्रेस यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारावर पुण्याची जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरला असून, त्यासाठी फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असून, त्याआधीच जागावाटपावरून महायुतीत राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. पुण्याची जागा पारंपरिकरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात असला, तरी भाजपने आपले संख्याबळ पुढे करत आक्रमक भूमिका घेतली आहे.या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे पुण्याची जागा भाजपलाच देण्याची मागणी केली आहे.
गणेश बिडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात भाजपचे स्वतःचे ३०९ नगरसेवक निवडून आलेले आहेत. याशिवाय दौंड नगरपरिषदेतील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य आणि इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे सात सदस्य भाजपसोबत असल्याने जिल्ह्यात भाजपकडे एकूण ३३३ मतांची ताकद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.तसेच पंचायत समिती सभापती आणि महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार असल्यामुळे भाजपचे संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक असल्याचे बिडकर यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु