
पोलीस निरीक्षकांसह कॉन्स्टेबल जखमी
नाशिक, 24 मे (हिं.स.) | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या नेण्यात येत असलेल्या चार गोवंशांची चांदवड पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता यशस्वी सुटका केली. या थरारक कारवाईदरम्यान तस्करांनी पोलिसांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली, ज्यात पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमी अवस्थेतही आरोपींचा पाठलाग करून दोघांना बेड्या ठोकल्या. या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गोवंश तस्करी रोखण्यासाठी विशेष गस्त मोहीम राबवली जात आहे. सकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि कॉन्स्टेबल गोविंद राऊत हे मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली.
पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक माहिती मिळताच पोलिसांनी संशयित वाहनाचा माग काढत राहूडच्या दिशेने पाठलाग सुरू केला. श्री रेणुका देवी घाटमाथा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या तस्करांच्या कारने (एमएच ०९ बीई ८०८०) पोलिसांच्या शासकीय वाहनाला (एमएच १५ जेएच ०४४६) समोरून भीषण धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले, तर पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कॉन्स्टेबल गोविंद राऊत हे दोघेही जखमी झाले.
जखमी अवस्थेत सिनेस्टाईल पाठलाग; दोन आरोपी जेरबंद
अपघातानंतर आरोपींनी वाहन सोडून डोंगराच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर दुखापत झालेली असतानाही पोलिसांनी अत्यंत धैर्याने आरोपींचा पाठलाग केला आणि अबु सुफियान अब्दुल करीम अन्सारी (वय ३२, रा. रमजानपुरा, मालेगाव) व मोहम्मद इरफान मोहम्मद अल्ताफ अन्सारी (वय २०, रा. इस्लामाबाद, मालेगाव) या दोघांना शिताफीने अटक केली. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यात ४ गुरे अत्यंत अमानुषपणे बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांची सुटका करून त्यांना मुंगसे येथील गोशाळेत सुरक्षित हलवले आहे.
या घटनेत पोलीस निरीक्षक वाघ यांच्या हाताला व कंबरेला मार लागला असून, कॉन्स्टेबल राऊत यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी चांदवड येथे भेट देऊन जखमी पोलिसांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांच्या अतुलनीय शौर्याचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV