अमरावती - बारा हजारांवर प्रवाशांची लाइफलाइन असलेली सिटी बस सेवा होणार बंद
अमरावती, 24 मे (हिं.स.)। बारा हजारांवर प्रवाशांची लाइफलाइन असलेल्या सिटीबसचे कंत्राट संपुष्टात येत असून पुढे ही सेवा चालविण्यास कंत्राटदाराने स्पष्ट नकार दिल्याने शहर बससेसची चाके थांबणार आहेत. त्यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना दररोज त्या
उद्या पासून बारा हजारांवर प्रवाशांची लाइफलाइनअसलेली सिटी बस सेवा होणार बंद ...


अमरावती, 24 मे (हिं.स.)।

बारा हजारांवर प्रवाशांची लाइफलाइन असलेल्या सिटीबसचे कंत्राट संपुष्टात येत असून पुढे ही सेवा चालविण्यास कंत्राटदाराने स्पष्ट नकार दिल्याने शहर बससेसची चाके थांबणार आहेत. त्यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना दररोज त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी खिशावर ताण सहन करावा लागणार आहे.

तत्कालीन महापालिका आयुक्त कुंदन कौशिक यांनी पुढाकार घेत २००६ मध्ये शहर बससेवेची मुहूर्तमेढ रोवली होती. ‘लोककल्याणकारी सेवा’ या शीर्षाखाली त्यांनी ही सेवा खासगी तत्त्वावर प्रारंभ केली होती. तेव्हापासून ‘आपली बस’ ही सेवा शहरातील कष्टकरी, श्रमजीवी वर्गासह विद्यार्थी, नोकरदार व सामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. या २० वर्षांत चार कंत्राटदार बदलण्यात आले असले तरी सेवा सुरू होती. महापालिकेस या माध्यमातून अल्प उत्पन्न मिळत असले तरी लोककल्याणकारी सेवा, या शीर्षाखाली सेवा अविरत होती. आता मात्र ही सेवा खंडित होणार आहे. सद्यस्थितीत बारा बसेस शहरातील सहा मार्गांवर धावत असून दररोज बारा हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. विद्यमान स्थितीत साहू टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, या कंत्राटदार कंपनीचा कंत्राट २५ मे २०२६ ला संपुष्टात येत आहे. आपली बसचा कंत्राट संपुष्टात येत असल्याने महापालिकेसमोर ही सेवा पूर्ववत ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विद्यमान कंत्राटदारास मुदतवाढ देऊन बससेवा सुरू ठेवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र कंत्राटदार महेश साहू यांनी ही सेवा सुरू ठेवण्यास आपण असमर्थ असल्याचे महापालिकेस कळविले आहे. ही सेवा चालविताना दरमहा सहा ते सात लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसल्याने मुदतवाढ स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या शहर बससेवेची चाके सोमवारनंतर बंद पडण्याची शक्यता कंत्राटदाराच्या नकाराने निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने कंत्राटदाराने ऑक्टोबरपर्यंत सेवा सुरू ठेवावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande