अमरावती - मॉन्सूनपूर्वी मुख्य नाल्यांच्या स्वच्छतेला वेग
अमरावती, 24 मे, (हिं.स.) आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जेसीबी मशीनच्या साहाय्याने नाल्यांमधील झाडेझुडपे, काडीकचरा, गाळ व इतर अडथ
मॉन्सूनपूर्वी मुख्य नाल्यांच्या स्वच्छतेला वेग


अमरावती, 24 मे, (हिं.स.)

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जेसीबी मशीनच्या साहाय्याने नाल्यांमधील झाडेझुडपे, काडीकचरा, गाळ व इतर अडथळे काढून स्वच्छता करण्यात येत आहे. चांदूररेल्वे शहरात सुमारे सात ते आठ प्रमुख नाले असून त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास पाणी साचून ते लगतच्या वस्त्यांमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अनेकदा घरांमध्ये पाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान होते, तर काही घरांचे नुकसान झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने मॉन्सूनपूर्व उपाययोजना म्हणून मुख्य नाल्यांची व्यापक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. नाल्यांमधील गाळ व कचरा काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार असून पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच परिसरातील अस्वच्छता दूर झाल्याने डासांची उत्पत्ती कमी होऊन नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीनेही दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत शहरातील अनेक प्रमुख नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्यात आली असून उर्वरित नाल्यांची स्वच्छता येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली. या मोहिमेत अनेक नगरसेवकही सक्रिय सहभाग घेत असून ते प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून कामांचा आढावा घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande