
* खिशातून भरावा लागला १,५३८ रुपयांचा भुर्दंड!
बीड, 24 मे (हिं.स.)।
धारूर तालुक्यातील आरणवाडी येथील शेतकरी संतोष भास्कर शिनगारे यांनी अत्यंत कष्टाने पिकवलेला ६०२ किलो कांदा सोलापूर बाजारपेठेत विकला असता, त्यांना अवघा ५० पैसे प्रति किलो असा धक्कादायक भाव मिळाला. यामुळे त्यांना कांद्याचे एकूण ३०१ रुपये मिळाले, मात्र वाहतूक आणि हमालीचा खर्च तब्बल १ हजार ८३९ रुपये झाल्याने, या शेतकऱ्याला उलट खिशातून १ हजार ५३८ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. ही घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये घडली. निसर्गाच्या लहरीपणाशी लढून पीक हाती आणल्यानंतरही बाजारातील घसरलेल्या दरांमुळे बळीराजावर कर्जबाजारी होण्याची आणि स्वतःचेच पीक विकण्यासाठी दंड भरण्याची वेळ आली आहे.
शेतकरी संतोष शिनगारे यांनी आपल्या एक एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतातील कांदा विकून चार पैसे हाती येतील या आशेने त्यांनी ३८ रुपये प्रति थैली या दराने १२ थैल्या विकत घेतल्या आणि ६०२ किलो कांदा सोलापूर मार्केटला पाठवला. मात्र, तिथे त्यांच्या पदरी घोर निराशा आली. या व्यवहारात १२ थैल्यांची किंमत ४५६ रुपये, वाहतूक भाडे १२०० रुपये, हमाली ६२ रुपये, तोलाई ३७ रुपये आणि इतर खर्च मिळून एकूण १ हजार ८३९ रुपये खर्च आला. कांद्याच्या विक्रीतून आलेल्या ३०१ रुपयांमधून हा खर्च वजा जाता शेतकऱ्याला खिशातून १५३८ रुपये द्यावे लागले. शेतात अजूनही १० टनांपेक्षा जास्त कांदा पडून असून, बाजारपेठेतील अशा भयानक स्थितीमुळे आता या कांद्याचे काय करावे, असा उद्विग्न प्रश्न शिनगारे यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत दुष्काळ आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागतो, त्यातच सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या जाचक निकषांमुळे शेतकरी आधीच चिंतेत असताना या घटनेने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis