
कोल्हापूर, 24 मे (हिं.स.)। नागाव ता. हातकणंगले येथील संभाजीनगर परिसरात भाड्याने रहाणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या अवघ्या 3 वर्षाच्या मुलीला विजेच्या खांबाच्या आर्थिंग तारेला स्पर्श झाल्यानंतर जोराचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. राजलक्ष्मी प्रताप निषाद मूळ रा. उत्तर प्रदेश असे या मुलीचे नाव आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात कामगार म्हणून काम करणारे प्रताप निषाद पत्नी आणि दोन मुलांसह नागाव संभाजीनगर येथे साळोखे यांच्या घरात भाड्याने रहात होते. आज रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांची 3 वर्षाची राजलक्ष्मी नावाची मुलगी दारात खेळत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबाचा ताण असलेल्या तारेला स्पर्श झाला. या तारेत वीज प्रवाह उतरल्याने विजेचा जोराचा धक्का बसून ही बालीका जागीच गतप्राण होऊन कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी घरमालक साळोखे यानां वारंवार सुचना देऊनही विजेचे कनेक्शन घेतलेल्या खांबाजवळ वाढलेली झाडे झुडपे काढली नाहीत, स्वच्छता आणि सुरक्षिततेची दक्षता घेतली नाही. कनेक्शन घेतलेल्या ठिकाणी फ्यूज न जोडता थेट कनेक्शन घेतले तेथील कोटींग निघालेल्या वायरमुळे विद्युत प्रवाह उलटा प्रवाहित झाला असल्याचा निष्कर्ष काढून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. आणि या घटनेला घरमालकास जबाबदार धरले. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास स. पो. नि. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar