
परभणी, 24 मे (हिं.स.)।
आगामी विधानपरिषदेच्या 17 जागा महायुतीतील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना शिंदे हे तीन्ही प्रमुख घटकपक्ष एकसंघपणे लढवतील, असे स्पष्ट चित्र असून या सतराही जागा वाटपाच्या फॉर्म्यूल्याबाबत महायुतीच्या श्रेष्ठीत निश्चितता झाली असून त्या फॉर्म्यूल्याप्रमाणे अवघ्या काही जागेतच अदलाबदल होईल, असे स्पष्ट संकेत आहेत.
विधान परिषदेच्या एकूण 17 जागांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पाठोपाठ त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतर्गत इच्छुकांच्या मोर्चेबांधणीसह वरिष्ठ पातळीवरसुध्दा मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु झाल्या आहेत. विशेषतः महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाने या निवडणूका एकसंघपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीतून यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्या पाठोपाठ जागा वाटपाचा फॉर्म्यूलासुध्दा जाहीर होईल, असे संकेत आहेत.
राज्यातील या सतराही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत महायुतीचे पारडे जड राहील, असे संकेत आहेत. त्यामुळेच महायुतीतील या तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींनी एकसंघपणे निवडणूक लढविण्याचा व संख्याबळाच्या आधारे जागा राखण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाप्रमाणे 17 पैकी 12 जागा भाजप तर 3 जागा शिवसेना शिंदे गट व 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल, असे संकेत आहेत. ढोबळ मानाने जागा वाटपाचा हा फॉर्म्यूला तीनही पक्षांच्या श्रेष्ठींनी निश्चित केला असून काही ठिकाणच्या पारंपारिक जागाच्या अदलाबदली संदर्भातसुध्दा विचार विनिमय सुरु असल्याची माहिती हाती आली आहे.
परभणीच्या जागेसंदर्भात संभ्रमच...
गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या रिंगणात विप्लव बाजोरीया यांनी एकसंघ शिवसेनेच्या माध्यमातून रिंगणात उतरले होते. त्याद्वारे, बाजोरीया यांनी मोठे यश पटकावले होते. परंतु, राज्यातील राजकीय स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर बाजोरीया यांनी शिवसेना उबाठा गटास सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट ही जागा स्वतःकडे राखेल, असे संकेत आहेत. परंतु, काही पारंपारिक जागांच्या अदलाबदलींचा विषयसुध्दा महायुतीत ऐरणीवर आला आहे. त्या संदर्भात निर्णय झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेवर दावा ठोकेल, अशीही शक्यता आहे. मतदारसंघांतर्गत संख्याबळाचा आधार हे त्या मागचे प्रमुख कारण असेल, हे निश्चित...
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis