
बीड, 24 मे (हिं.स.)।
शिवसैनिक म्हणजे फक्त नाव नाही, तर संकटात धावून जाणारी ताकद आहे! याच विचाराला साजेसं कार्य करत भोगलगाव येथील धाडसी युवक विकास नारायण मडके यांनी गोदावरी नदीत बुडणाऱ्या दोन चिमुकल्या मुली व एका वृद्ध आजीचा जीव वाचवत खऱ्या अर्थाने शिवसेनेची परंपरा जिवंत ठेवली आहे.
गोगलगाव येथील गोदावरी नदीपात्रात घडलेल्या या थरारक घटनेत तीन महिला पाण्यात बुडत असताना, आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अशा गंभीर प्रसंगी विकास मडके यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट नदीत उडी घेतली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तिघांचे प्राण वाचवले.
या अद्वितीय शौर्याचा गौरव करत राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्वतः उपस्थित राहून विकास मडके यांचा भव्य सत्कार केला. यावेळी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले, अशाच धाडसी शिवसैनिकांमुळेच समाज सुरक्षित आहे. जनतेच्या सेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं हीच खरी शिवसेनेची ओळख आहे.
कार्यक्रमात बीड लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण, अविनाश जाधव, जिल्हाप्रमुख सुमित कोळपे तसेच अनेक शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू ज्ञानेश्वर मडके यांनी अभिमानाने सांगितले,
शिवसैनिक असा असावा, जो स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे प्राण वाचवतो. विकास मडके हा आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे.
या घटनेमुळे विकास मडके हे केवळ एका गावाचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे ‘हिरो’ ठरले असून, त्यांच्या धाडसामुळे शिवसेनेचा जनतेशी असलेला जिव्हाळा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis