
अमरावती, 24 मे (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुका या नेहमीच आर्थिक ताकद, गटबाजी आणि मतांच्या अंकगणितामुळे चर्चेत राहिल्या आहेत. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
अमरावतीतून हर्षजीत देशमुख यांचे नाव विधान परिषदेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत असून, त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हार्दिक शुभेच्छांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर सुरू झाला असून, “सोहन केक”चे बॉक्स मतदारांच्या घरी पाठविले जात असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच प्रचार आणि संपर्क मोहिमेला अनौपचारिकरीत्या सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या निवडणुकीत मतांच्या व्यवहारांबाबतही जोरदार चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक पातळीवर एका मताची किंमत तब्बल दहा लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पैशांचा प्रभाव निर्णायक ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक इच्छुकांकडून नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींशी संपर्क वाढविण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका या थेट जनतेकडून न होता निवडक लोकप्रतिनिधींकडून होत असल्याने प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध राजकीय डावपेच आखले जात असल्याची चर्चा रंगत आहे. काही ठिकाणी गुप्त बैठका, तर काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
अमरावती जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण ४५३ मतदार असून, त्यामध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज, पक्षनिहाय रणनीती आणि राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी