
शहरातील राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढणार
लातूर, 24 मे (हिं.स.)।
रेणापूर - आष्टा मोड - उदगीर - देगलूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ आणि नांदेड - कंधार - जळकोट - उदगीर - कमलनगर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग रस्ते उदगीर नगर परिषद हद्दीतून जातात. शहरातून जाणाऱ्या या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उदगीर शहरात येत्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्ग रस्ते रुंदीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीर हे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. उदगीर शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नगरपरिषद हद्दीबाहेर राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते रुंद आहेत. परंतु शहरातील राष्ट्रीय महामार्ग रस्ते अतिशय अरुंद आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असले तरी या शहरातील महामार्गावर सर्वत्र अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नांदेड - कंधार - जळकोट - उदगीर - कमलनगर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० हा शहरातील जळकोट नाका , कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बीदर रोड असा जातो. या मार्गावरील शहरातील मुख्य रस्ता अतिशय अरुंद आहे. तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून येतात. तर आष्टा मोड - नळेगाव - उदगीर - देगलूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ हा शहरातील डॉ. झाकीर हुसेन चौक , जय जवान चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक - कृष्णकांत कुलकर्णी चौक ते देगलूर रोड असा जातो. मात्र हे शहरातील दोन्ही राष्ट्रीय महामार्ग अतिशय अरुंद आहेत. शहरातील या महामार्गाची रुंदी वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उदगीर नगरपालिकेच्या वतीने शहरातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
शहरा बाहेरून राष्ट्रीय महामार्गाचे वळण रस्ते कधी होणार ?
उदगीर शहर हे दोन राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहे. परंतु दोन्ही राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातात. शहरातील रस्ते अरुंद असल्याने आणि वाहतूक व वाहनांची संख्या वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांचे वळण रस्ते होणे अत्यंत आवश्यक आहे. उदगीर शहरा बाहेरून राष्ट्रीय महामार्गांचे वळण रस्ते करण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाची रुंदी किती ? पालिकेने माहिती मागविली !
उदगीर शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ या महामार्ग रस्त्यांची रुंदी उदगीर नगर परिषद हद्दीपर्यंत किती आहे. याबाबत उदगीर नगरपालिकेच्या वतीने लातूर व नांदेड या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे. उदगीर नगर परिषदेची सुधारित विकास योजना मंजूर आहे. त्यामुळे लवकरच शहरातील राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण सुरू होणार असल्याचे समजते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis