
परभणी, 24 मे (हिं.स.)परभणी ते नांदेड या महामार्गावरील बलसा खु. या गावालगत गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून बांधकाम खात्याने या गावालगत तात्काळ दोन्ही बाजूंनी गतिरोधक बससवावेत, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते पांडुरंग खिल्लारे यांनी केली आहे. बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना गटनेते खिल्लारे यांनी सादर केलेल्या या निवेदनातून या गावातील ग्रामस्थांना रस्ता ओलांडतांना अनंत अडचणी येऊ लागल्या आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांसह अबालवृध्दांना रस्ता ओलांडणे कठिण होऊन बसले आहे. त्यामुळे अभियंत्यांनी याचे गांभीर्य ओळखून दोन्ही बाजूंनी गतिरोधक अंथरावेत, अशी मागणी केली. या निवेदनावर अर्जून रणेर, सुनील रणेर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis