
सोलापूर, 24 मे (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा पालकमंत्रीजयकुमार गोरेयांनी व्यक्त केली. विरोधकांना 100 मतेही मिळणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेताधैर्यशील मोहिते-पाटीलयांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.पालकमंत्री जयकुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.
यावेळी पत्रकारांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी विरोधकांची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये स्पष्ट झाल्याचा दावा केला. काँग्रेसकडे केवळ पाच तर एमआयएमकडे आठ नगरसेवक असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांची ताकद मर्यादित असल्याचे सूचित केले.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे मान्य करताना गोरे म्हणाले की, माजी आमदारराजेंद्र राऊतआणि ते एकाच विमानाने सोलापुरात आले म्हणून त्यातून वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मुंबईहून सोलापूरसाठी एकच विमान सेवा उपलब्ध असल्याने हा योगायोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “कॉक्रोच पार्टी” संदर्भातील सोशल मीडियावरील पोस्टबाबत विचारलेल्या प्रश्नावर गोरे म्हणाले की, अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.यावेळी त्यांनी केंद्रात आणि राज्यात भाजप नेतृत्वाखाली विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड