
सोलापूर, 24 मे (हिं.स.)।
सोलापूरसह राज्यात वाढत्या उष्णतेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून, त्यातच ग्रामीण भागातील वारंवार होणाऱ्या वीज भारनियमनामुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. उन्हाळी पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण झाले असून, जनावरांच्या दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.यंदा उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांमध्ये विहिरी, आड आणि बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून शेततळ्यांमध्ये पाणीसाठा करून ठेवला असला, तरी ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या वीज कपातीमुळे हे पाणी वेळेवर पिकांना देता येत नाही. परिणामी उभी पिके पाण्याअभावी होरपळून निघत आहेत.विशेषतः डाळिंब, ऊस, केळी यांसारख्या बागायती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाणी उपलब्ध असूनही केवळ लोडशेडिंगमुळे सिंचन करता येत नसल्याने पिके जगविणे कठीण झाले आहे. जनावरांसाठी घेतलेल्या चारा पिकांनाही पुरेसे पाणी देता येत नसल्याने पशुपालकांमध्येही चिंता वाढली आहे.
दरम्यान, सकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दूध काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारा मशीन बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक पशुपालकांना हाताने दूध काढावे लागत असून त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होत असल्याची तक्रार केली जात आहे.ग्रामीण भागातील वाढते लोडशेडिंग तातडीने कमी करून शेती आणि पशुपालनासाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी आणि पशुपालकांकडून लोकप्रतिनिधी तसेच महावितरण प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड