मोटेगावकर यांचा जुना व्हिडिओ व्हायरल; “पिझ्झा आणि वडा-पाव हे कुत्र्याचे आहार”
लातूर, 24 मे (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आलेल्या मोटेगावकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना दिलेली काही विचित्र उदाहरणे चर्चेचा विषय ठरत आहेत. व्हाय
मोटेगावकर


लातूर, 24 मे (हिं.स.)।

नीट पेपरफुटी प्रकरणात नाव समोर आलेल्या मोटेगावकर यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवताना दिलेली काही विचित्र उदाहरणे चर्चेचा विषय ठरत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “पिझ्झा आणि वडा-पाव हे कुत्र्याचे आहार आहेत” तसेच “पाणीपुरी खाणारे भिकारी असतात” अशा वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या वक्तव्यांमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून काही पालक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या मोटेगावकर यांच्या या जुन्या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर काही जणांनी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याऐवजी अशा प्रकारची उदाहरणे देणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या व्हिडिओवर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी उपरोधिक शैलीत, “आणि खरंच असे असेल तर लातूरकरांनी आता पिझ्झा, वडा-पाव आणि पाणीपुरी खाऊ नये,” अशा प्रतिक्रिया देत टोलेबाजी केली आहे.

या व्हिडिओची सत्यता आणि तो नेमका कधीचा आहे याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. तसेच संबंधित व्यक्तीकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande