
नांदेड, 24 मे (हिं.स.)।
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात
३१ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राज्यमाता गोमाता संवाद यात्रा चे आयोजन करण्यात आले असून ही संवाद यात्रा नांदेड येथे 6 जून 2026 शनिवार रोजी सायंकाळी 4 वाजता येणार आहे. या संवाद यात्रेचे आयोजन महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
गोसेवा आयोगाच्या स्थापनेनंतर तीन वर्षात केलेल्या कार्याचा आढावा, गोशाळांसाठीच्या योजना, गोपालना विषयी शासनाची भूमिका जनमानसात मांडण्यासाठी तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना गोसेवा आयोगा मार्फत चालणाऱ्या योजनांची माहिती व्हावी व पशुसंवर्धन विभाग आणि गोशाळा त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि गोशाळा यांच्यामध्ये संवाद
इनामी घडून यावा यासाठी संवाद यात्रेचे आयोजन
करण्यात आले आहे. याच सोबत शेण-गोमूत्र इत्यादींपासून तयार केलेली अर्थात विविधप्रकारची पंचगव्य उत्पादने, गो आधारित स्वास्थ्य चिकित्सा, गो आधारित शेती याविषयी पण लोकांना माहिती व्हावी व जनजागरण व्हावे असा पण या गोमाता संवाद यात्रेचा हेतू आहे. यातूनच गोवंश पालनाविषयी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. या भव्य संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व गोभक्त, गोरक्षक व गोशाळा संचालकांनी या संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे. या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेस जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद सीईओ, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, गोपालकव शेतकरी, गोरक्षक
अशा सर्वांना निमंत्रित करण्यात येणार आहे. या नियोजन बैठकीस नांदेड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखारामजी खुणे, जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक उपायुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, सहाय्यक उपायुक्त डॉ. अरविंद गायकवाड, गोशाळा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोतराव कंठेवाड, हरीशजी तिवारी, अच्युत महाजन, सत्यवानजी गरुडकर, भवानभाई पटेल, सनतकुमार महाजन, रघुनाथ सुगावे यांच्यासह जिल्ह्यातील 20 गोशाळांचे संचालक उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक उपायुक्त डॉ. अरविंद गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन गोशाळा महासंघाचे जिल्हा सचिव प्रल्हाद घोरबांड यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी तंत्रस्नेही गोसेवक आकाश काळे यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis