
अमरावती, 24 मे, (हिं.स.) सद्या उष्णतेच्या लाटेने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानवाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थाने वृक्ष लागवड करून तापमानवाढ रोखणे महत्वाचे झाले आहे. यासाठी दरवर्षी वृक्ष लागवडीची लोक चळवळ प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन मार्फत विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देण्याची मागणी आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
यावर्षी अमरावती शहर भयंकर तापत असून 'देशातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर' अशा बातम्या सातत्याने अमरावतीबाबत प्रकाशित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुद्धा अलर्ट जारी केला आहे. वाढत्या तापमानामुळे मनुष्यजीवांची लाही -लाही होत असून आरोग्यावर सुद्धा परिणाम जाणवत आहे. येत्या काळात हीच परिस्थिती राहिल्यास अमरावती शहरातील जनजीवन विस्कळीत होऊन त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाचं भेडसावणार असल्याने आज हि तापमानवाढ रोखण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम हाती घेणे नितांत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाड लावणे आवश्यक असून शाळा, महाविद्यालय, रस्त्याच्या दुतर्फ़ा,तसेच खुले मैदान व मोकळ्या जागेत झाडे लावून आपल्या शहराला हरित व सुंदर बनविण्याची आवश्यकता आहे. शहरात वृक्षारोपण मोहिमेला गती देण्यासाठी विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देणे सुद्धा महत्वाचे आहे. या करिता जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत स्वतंत्ररित्या तरतूद करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पालकमंत्री महोदयांकडे केली आहे.
दरवर्षी वृक्ष लागवडीची लोकचळवळ प्रभावीपणे राबविण्यासाठी या मोहिमेत शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सामाजिक मंडळे , जिल्हा प्रशासन, आरोग्य संस्था, पर्यावरण संघटना व वृक्ष प्रेमी यांचा सक्रिय पुढाकार वाढवून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तसेच लोक सहभागातून वृक्ष लागवड अभियानाला गती देण्याचे आवाहन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले आहे.
आगामी महिन्यात निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर अमरावती शहराच्या वृक्ष संवर्धन व पर्यावरण सुरक्षा अभियानात सक्रिय असणाऱ्या सर्व आस्थापना व संघटनांची बैठक लावून या वृक्ष लागवड लोकचळवळीला मूर्त स्वरूप देण्याची विनंती सुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी