
परभणी, 24 मे (हिं.स.)।
ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली तर जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ती निश्चितच पूर्ण होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण निवळी येथील वैभव वैजेनाथ ठोंबरे याने घालून दिले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या शेतकरी पुत्राने एकाच वेळी देशातील दोन नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्याला तब्बल 15 लाख 65 हजार रुपयांची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.
वैभव ठोंबरे याची देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्या ‘इंडियन इन्स्टिट्युट फॉर ह्युमन सेटलमेंट्स’ येथे एम.एस्सी. सस्टेनेबिलिटी सायन्स अँड प्रॅक्टिस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून त्याला 15.65 लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यासाठी हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे.
याचबरोबर वैभवची अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी येथे एम.ए. इन डेव्हलपमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीदेखील निवड झाली आहे. सामाजिक विकास, ग्रामीण परिवर्तन आणि शाश्वत विकास या विषयांमध्ये वैभवला विशेष रुची असून सातत्यपूर्ण अभ्यास आणि सामाजिक भान जपत त्याने हे यश मिळवले आहे. तसेच ‘शिव नादर इन्स्टिट्युशन ऑफ इमिनन्स’ येथे एम.ए. इन रुरल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या मुलाखतीसाठीही त्याची निवड झाली आहे. त्यामुळे वैभवच्या शैक्षणिक प्रवासाला आणखी नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैभव ठोंबरे यांच्या या यशामुळे निवळी गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामीण भागातील युवकांसाठी त्यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.
अपयश आले तरी खचलो नाही....
घरची परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही वैभवने कधीही हार मानली नाही. शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात त्याने शिक्षणाची वाट अखंड सुरू ठेवली. या यशाचे श्रेय त्याने आपल्या आई-वडिलांसह एकलव्य इंडिया फाऊंडेशन, पाथ एज्यूकेशन फाऊंडशेन तसेच कठीण काळात साथ देणार्या मित्रपरिवाराला दिले आहे. अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवले, त्यामुळेच आज हे यश मिळाले, अशी भावना वैभवने व्यक्त केली. भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis