
आमदार रोहित पवारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती
चांदवड, 24 मे (हिं.स.)।
: कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंगळवारी (दि. २६) चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चाचे आयोजन केले आहे. मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड चौफुली येथे सकाळी नऊला हा मोर्चा निघणार आहे.
कांद्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हा एल्गार पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी या महामोर्चाचे आयोजन केले आहे.
आमदार रोहित पवार यांच्यासह माजी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे या प्रमुख नेत्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात चांदवड परिसरासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV