

किडनी, लिव्हर व नेत्रदानातून अनेकांना नवे जीवन
नाशिक, 24 मे, (हिं.स.)। नाईन पर्ल्स हॉस्पिटल, नाशिक येथे उपचारादरम्यान ब्रेन स्टेम डेथ घोषित झालेल्या डॉ विजयालक्ष्मी विनायक खैरे (वय ५४ वर्षे) या महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी अत्यंत संवेदनशील व प्रेरणादायी निर्णय घेत किडनी, लिव्हर व नेत्रदान करून अनेकांना नवजीवन दिले.
सदर रुग्णावर प्रारंभी मेडिनोव्हा शताब्धी येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या मेंदूला कायमस्वरूपी इजा झाल्याचे सांगितले. न्यूरोलॉजिकल तपासण्यांमध्येही हे स्पष्ट झाले. रुग्णाचे कुटुंब स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने त्यांनी स्वतःहून अवयवदानाचा निर्णय घेतला.
अवयवदानाची पुढील प्रक्रिया करणेसाठी २० मे २०२६ रोजी त्यांना नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान रुग्ण प्रतिसाद देत नसल्याने न्यूरोलॉजिस्ट डॉ. धनंजय दुबेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये रुग्ण ब्रेन स्टेम डेथ अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले
यानंतर न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिविस्ट, प्रत्यारोपण समन्वयक आणि प्रशासन प्रमुख यांनी कुटुंबीयांना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ब्रेन स्टेम डेथ समितीच्या चार सदस्यांनी सहा तासांच्या अंतराने दोन अँपनिया चाचण्या घेतल्यानंतर रुग्णाला अधिकृतरीत्या मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली.
झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर (ZTCC), पुणे यांना याबाबत कळविण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अवयव वाटप करण्यात आले. यामध्ये एक किडनी नाशिक येथील नाईन पर्ल्स हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित करण्यात आली, तर दुसरी किडनी पुणे येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात देण्यात आली. तसेच लिव्हर पुणे येथील मेडिकव्हर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.
या अवयवदान प्रक्रियेदरम्यान नाशिक ते पुणे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. नाशिक, अहिल्यानगर व पुणे पोलिसांनी यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य करत अवयव अवघ्या तीन तासांत पुण्यात पोहोचविण्यात यश मिळवले.
या कार्यात नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे डॉ. सचिन कुमार पाटील तसेच शताब्दी हॉस्पिटलचे डॉ. अमित येवले व डॉ. सुमित मंडाले यांनी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. या संपूर्ण अवयवदान प्रक्रियेप्रकियेमध्ये डॉ.नागेश अघोर यांनी अत्यंत काळजीने लक्ष घालून सगळी अवयवदानाची प्रकिया सर्वांशी योग्य समन्वय साधून त्यांच्याकडून पार पाडून घेतली तसेच प्रत्यारोपण समन्वयक श्री. अमोल दुगजे यांनी अवयवदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.
याचवेळी रुग्णाचे दोन्ही नेत्रही दान करण्यात आले. सुशील नेत्रपेढीचे समन्वयक राहुलदेव जाधव व टीम अवघ्या १५ मिनिटांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली व २० मिनिटांत नेत्र संकलन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. संकलित नेत्र सुशील नेत्रपेढी येथे जतन करण्यात आले असून लवकरच दोन दृष्टीहीन रुग्णांना दृष्टी देण्यासाठी उपयोगात येणार आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेत नाईन पर्ल्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. नागेश अघोर, डॉ. राजेंद्र देशमुख,डॉ. योगेश चौधरी, , डॉ. धनंजय दुबेरकर, डॉ. दिनेश वाघ, डॉ. हुसेन बोहरी, डॉ. शीतल कुमार हिरण, डॉ. सचिन कुमार पाटील ,इंटेन्सिव्हिस्ट डॉ आशा देशमुख, डॉ. विनायक शेंडगे, तसेच अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून, मृत्यूनंतरही अनेकांना जीवनदान देण्याची डॉक्टरांचे अवयवदान ही प्रेरणादायी घटना ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV