एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन करा : कृषि विद्यापीठाद्वारे शेतकर्यांना आवाहन
परभणी, 24 मे (हिं.स.)। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत दीर्घकालीन तर काही
एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन करा : कृषि विद्यापीठाद्वारे शेतकर्यांना आवाहन


परभणी, 24 मे (हिं.स.)।

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत दीर्घकालीन तर काही ठिकाणी कमी ते मध्यम कालावधीचे पावसाचे खंड पडण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी खरीप हंगामाचे नियोजन दक्षतेने करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने केले आहे.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, खरीप हंगामाचे नियोजन शेतकर्यांनी दक्षतेने करणे आवश्यक आहे. कमी कालावधीत येणारी व कमी पाण्यावर तग धरणारी पिके आणि वाणांची निवड करावी. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया केल्यास उगवण सुधारण्यासह रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन मिश्रपीक व आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनातील जोखीम कमी करता येईल. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. तसेच पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास कमी पावसामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. शेतकर्यांनी कृषि विद्यापीठ व कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी शेतकर्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा व समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. तसेच, कृषी विद्यापीठाच्या शिफारशी व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अधिक माहितीसाठी अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आनंद गोरे 9588648242 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande