
छत्रपती संभाजीनगर, 24 मे (हिं.स.)।
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला त्यातही वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले. काही भागांत हरभऱ्याएवढ्या गाराही पडल्या. अनेक भागांत आंबा, पपई, केळीच्या फळबागांना फटका बसला. दरम्यान, या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड तालुक्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गाराही पडल्या. केळीच्या आणि पपईच्या बागेचे मोठे नुकसान झाले.
परिसरात घरांवरील पत्रे उडाले. तीर्थपुरी शहरात रिमझिम सरी पडल्या. अंबड तालुक्यातील गोंदी शिवारात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत शनिवारी पावसाच्या सरी कोसळल्या. औंढा, वसमत येथेही शनिवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
जिल्ह्यातील काही भागांत शुक्रवारपासून ढगाळ वातावरण होते. त्यात काही काळ सूर्यदर्शन नाही. वादळी वारे वाहिले, तसेच काही भागांत पावसाचा शिडकावा झाला. बीड तालुक्यातील म्हाळसापूर येथे गाराही पडल्या.
नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत अचानक हवामानात बदल झाला. पंधरा ते वीस मिनिटे जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत.
परभणी शहरासह परिसरात स्वरूपात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या जोरदार सरींमुळे तुंबलेल्या नाल्या वाहू लागल्या. तर, पाण्याचा निचरा होत नसल्याने सकल भागातील रस्त्यावर पाणी वाहू लागले होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis