
नांदेड, 24 मे (हिं.स.)।
नांदेड स्थानिक प्राधिकार निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आला असून त्यामुळे नांदेड मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला देण्यात यावा अशी मागणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांची बैठक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या 'साईसुभाष' या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत नांदेड विधान परिषद प्राधिकार मतदार संघाची निवडणूक लढवावी की, नाही याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून या मतदार संघातून माजी मंत्री कमलकिशोर कदम हे विजयी झाल्याचा हवाला देत हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पक्षांचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट देऊन त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक पार पडली असून या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवकांनी पक्षांचे आदेश पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis